citynewsJalnaLatest NewsMaharashtra

सलग दोन दिवस सॉमिलवर छापे; मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड जप्त, लाकूड माफियांमध्ये खळबळ

जालना : जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि बेकायदेशीर लाकूड साठ्याविरोधात वनविभागाने मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. सलग दोन दिवस चाललेल्या या कारवाईत अनेक सॉमिल, टिंबर मार्ट आणि संशयित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या धाडसत्रात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड जप्त करण्यात आले असून, वनविभागाच्या आक्रमक कारवाईमुळे लाकूड माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र वनविभागाच्या जालना उत्तर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्राने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. वनसंपत्तीचे संरक्षण आणि अवैध वृक्षतोड रोखण्याच्या उद्देशाने विशेष गस्ती पथक तयार करून तालुक्यातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकण्यात आल्या.

राजूर येथील धनक्ष्री सॉमिलवर मोठी कारवाई

राजूर येथील धनक्ष्री सॉमिलवर टाकलेल्या धाडीत वन गुन्हा क्रमांक T01/2026 अंतर्गत तब्बल 8.513 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विश्वकर्मा आणि गुडलक सॉमिलमध्येही जप्ती

भोकरदन येथील विश्वकर्मा सॉमिलवर करण्यात आलेल्या कारवाईत वन गुन्हा क्रमांक T02/2026 अंतर्गत 5.421 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. तसेच गुडलक सॉमिलवर छापा टाकून 11.037 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले.

याशिवाय के. के. टिंबर मार्ट सॉमिल आणि गीता सॉमिलवरही वनविभागाने धाड टाकली. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठवून ठेवलेले लाकूड आढळून आले.

भोकरदन-आलापूर रोडवर गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

भोकरदन-आलापूर रोडवर अवैध लाकूड साठा असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ धाड टाकली. येथे अवैधरित्या साठवून ठेवलेले कडुनिंबाचे लाकूड जप्त करण्यात आले.

या प्रकरणी मोहम्मद जुनेद मोहम्मद फईन (रा. भोकरदन) यांच्याविरुद्ध वन गुन्हा क्रमांक T07/2026 दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 7.867 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले.

निता फुले यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोहीम

ही संपूर्ण मोहीम वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निता फुले यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

“अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची खैर नाही”

वनविभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, वनसंपत्तीची हानी करणाऱ्यांविरुद्ध अशाच कठोर कारवाया सुरू राहतील. अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर वाहतूक आणि लाकूड साठ्याविरोधात पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या धाडी टाकल्या जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लाकूड माफियांमध्ये भीतीचे वातावरण

वनविभागाच्या या धडक मोहिमेमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोकरदन तालुक्यात वनसंपत्ती वाचवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही कठोर भूमिका पर्यावरणप्रेमींसाठी दिलासादायक ठरत असून, अवैध वृक्षतोडीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button