AccidentNewscitynewsJalnaMaharashtra

जळकी बाजार फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू!

पंचर झालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी, बुलढाणा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

सिटी न्यूज | सिल्लोड

सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात जळकी बाजार फाट्यावर शनिवारी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्त्यावर पंचर झाल्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे जाईचा देव परिसरासह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाईचा देव येथील चार जण मादणी येथे मिस्त्री कामासाठी गेले होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर चौघेही एकाच दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतत होते. दरम्यान, जळकी बाजार फाट्याजवळ एका ट्रॅक्टरची ट्रॉली पंचर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीने उभ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. मात्र, उपचार सुरू असताना संदीप शामधन मंडावत (वय ३४) आणि सचिन नंदू जामुंदे (वय ३२) यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातात विकास भीमराव कपाटे (वय ४५) आणि प्रशांत व्यंदेशकर (वय ३५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल भागवत शेळके, व्ही. आर. पवार आणि दगडू तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, रस्त्यावर पंचर झालेली ट्रॅक्टर-ट्रॉली उभी असताना आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, यासह अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करीत आहेत. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button