‘स्वामिनी प्रस्तुत होम मिनिस्टर – स्त्री अभिमानाचा’ सोहळ्यात २५० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग!

महिलांच्या सन्मानाचा आणि आत्मविश्वासाचा अनोखा उत्सव; विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांनी रंगला कार्यक्रम, सिटी न्यूज मीडिया पार्टनर
सिटी न्यूज | नागपूर
महिलांच्या सन्मानाचा, आत्मविश्वासाचा आणि आनंदाचा उत्सव ठरलेल्या ‘स्वामिनी प्रस्तुत होम मिनिस्टर – स्त्री अभिमानाचा’ या विशेष कार्यक्रमाला नागपूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तब्बल २५० महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. विविध मनोरंजक खेळ, स्पर्धा आणि आकर्षक उपक्रमांमुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

सोनाली बुंदे, मयुरी टेंभरे आणि सारिका जावडेकर यांच्या संयुक्त पुढाकारातून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वामिनी होम मिनिस्टर’ या संकल्पनेच्या माध्यमातून महिलांना आपले कौशल्य, कलागुण आणि आत्मविश्वास सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. महिलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका वृंदा विकास ठाकरे, प्रभाग क्रमांक ३७ च्या नगरसेविका निधी तेलगोटे तसेच नागपूर जिल्हा नगरपालिका प्रशासन शाखेचे सहआयुक्त विनोद जाधव यांच्या सहचारिणी सौ. संगीता विनोद जाधव यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय अनेक मान्यवर महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभागी महिलांचा उत्साह वाढविला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष सौंदर्यविषयक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. सलून ३६० यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना डी-टॅन सेवा देण्यात आली, तर रिशेप स्टुडिओच्या माध्यमातून मोफत कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमासाठी सलून ३६० चे मिलिंद पाटील आणि आकांक्षा पाटील तसेच रिशेप स्टुडिओच्या डॉ. लीना लेमडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून सिटी न्यूजने महत्त्वाची भूमिका बजावली. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, विविध स्पर्धांमधील त्यांचा उत्साह आणि एकत्रित सहभाग यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.
महिलांना सन्मान, आनंद आणि आत्मविश्वास देणारा हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता महिला शक्ती आणि स्त्री अभिमानाचा उत्सव ठरला. ‘स्वामिनी प्रस्तुत होम मिनिस्टर – स्त्री अभिमानाचा’ या संकल्पनेतून महिलांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ मिळाल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.



