
पेनटाकळी आणि खडकपूर्णा धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव शासनाकडे; येळगाव धरण परिसरातील विहिरींच्या माध्यमातूनही पाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न
सिटी न्यूज | गजानन राऊत, बुलढाणा
बुलढाणा शहराला यंदा दुष्काळाची झळ अधिक बसू नये आणि नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातील जलसाठा बाष्पीभवनामुळे दिवसेंदिवस घटत असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पेनटाकळी आणि खडकपूर्णा या दोन धरणांमधून बुलढाणा शहरापर्यंत पाणी आणण्याचा प्रस्ताव आमदार गायकवाड यांनी शासनाकडे सादर केला असून, या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
बुलढाणा शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता केवळ येळगाव धरणावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेत पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. पेनटाकळी आणि खडकपूर्णा धरणांमधून पाणी उपलब्ध झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे या दोन्ही जलस्रोतांचा वापर करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनदरबारी मांडण्यात आला आहे.
दरम्यान, येळगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठीही विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. धरण क्षेत्रात विहिरींचे खोदकाम करून त्याद्वारे पाणी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच धरणातील पाण्याचा अनावश्यक उपसा रोखण्यासाठी येळगाव धरणातून पाणी उपसा करणाऱ्या सर्व मोटारपंपांचे वीजजोडणी कनेक्शन तोडण्यात आले आहेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि धरणातील साठ्याचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
सहाव्या दिवशी केवळ ५० मिनिटे पाणीपुरवठा
बुलढाणा शहरातील सध्याची पाणीपुरवठ्याची परिस्थिती पाहता नागरिकांना सहाव्या दिवशी केवळ ५० मिनिटे पाणी मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात आणि आगामी दिवसांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणे आणि उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर करणे आवश्यक बनले आहे. या परिस्थितीवर आमदार संजय गायकवाड प्रशासनाच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांसोबत पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर चर्चा
शहरातील सुज्ञ नागरिकांनी आमदार संजय गायकवाड यांची भेट घेऊन येळगाव धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती, शहराचा पाणीपुरवठा आणि भविष्यातील पर्यायी उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती तसेच आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहराला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पर्यायी जलस्रोतांचा शोध, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव कितपत पुढे जातो, येळगाव धरण परिसरातील विहिरींमधून किती पाणी उपलब्ध होते आणि शहराच्या पाणीपुरवठ्यात कधी सुधारणा होते, याकडे आता बुलढाणेकरांचे लक्ष लागले आहे.



