चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; झोपेतच कुऱ्हाडीने वार करून संपवले जीवन!

वाशिमच्या जऊळका येथील धक्कादायक घटना; हत्येनंतर आरोपी पती फरार, पोलिसांनी मालेगावातून घेतले ताब्यात
सिटी न्यूज | वाशिम
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथे उघडकीस आली आहे. दिनेश जोंधळे (वय ३९) असे आरोपी पतीचे नाव असून, शारदा जोंधळे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, जऊळका पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्याला मालेगाव शहरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश जोंधळे हा व्यसनाधीन असल्याचे सांगण्यात येत असून, पत्नी शारदा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो वारंवार तिच्याशी वाद घालत असे. शनिवारी रात्री पती-पत्नी नेहमीप्रमाणे घरात झोपले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास संशयातून संतप्त झालेल्या दिनेशने झोपेत असलेल्या शारदा यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शारदा यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दिनेश घरातून पसार झाला. दरम्यान, या दाम्पत्याला तीन मुले असून, त्यापैकी दोन मुली विवाहित आहेत, तर १५ वर्षीय मुलगा शिक्षण घेत आहे. आरोपीचे वृद्ध आई-वडील घरासमोर असलेल्या छोट्या स्वतंत्र घरात राहतात. घटनेच्या रात्री मुलगा आणि मुलगी आजी-आजोबांसोबत झोपण्यासाठी गेले होते.
रविवारी सकाळी आई-वडील अद्याप झोपेतून का उठले नाहीत, हे पाहण्यासाठी मुलगी त्यांच्या घरी गेली. तिने आधी आवाज देऊन पाहिले; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा ठोठावला असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहिले असता आई शारदा या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या, तर वडील घरातून गायब असल्याचे आढळले. यानंतर हत्येचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर, हवालदार रतन बावस्कर तसेच पोलीस कर्मचारी अमोल पाटील, विनोद दामोदर आणि सलीम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता तो मालेगाव शहरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
या घटनेमुळे जऊळका परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एका संशयातून हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास जऊळका पोलीस करीत आहेत.



