AmravaticitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था; दुर्गंधी, घाण आणि तुटफुटीमुळे नागरिक संतप्त

अमरावती : शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे दावे करणाऱ्या अमरावती महानगरपालिका प्रशासनाची मोठी पोलखोल समोर आली आहे. कारण, खुद्द महानगरपालिका मुख्यालय परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अस्वच्छता, दुर्गंधी, तुटफुट आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना अक्षरशः नाक दाबून या परिसरातून जावे लागत आहे.

राजापेठ झोन अंतर्गत अंबापेठ प्रभाग क्रमांक १३ मधील महानगरपालिका मुख्यालय परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित साफसफाईचा अभाव, बंद पडलेले नळ, तुटलेले विद्युत बोर्ड आणि सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे या शौचालयांचा वापर करणे नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे.

मुख्यालयातच अस्वच्छतेचे वास्तव

महानगरपालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांबरोबरच राजकमल चौक परिसरातील घुमंतू नागरिकांकडूनही या शौचालयांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, त्यानुसार देखभाल न होत असल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. शौचालय परिसरात इतकी दुर्गंधी पसरली आहे की नागरिकांना नाक दाबून जावे लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शौचालयातील बेसिनला लावलेले नळ बंद अवस्थेत आहेत. काही ठिकाणी विद्युत बोर्ड तुटलेले असल्याने सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित स्वच्छता आणि देखभालीचा पूर्णतः अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

चुनाभट्टी परिसरातील स्थिती आणखी गंभीर

याच प्रभागातील चुनाभट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था तर अधिकच भयावह असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथे पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, वीज पुरवठा खंडित आहे आणि शौचालयाकडे जाणारा मार्ग कचऱ्याच्या ढिगाऱ्याने व्यापला आहे. परिणामी, नागरिकांना या शौचालयांचा वापर करणे जवळपास अशक्य झाले आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

“जाहिरातींपेक्षा प्रत्यक्ष कामाला प्राधान्य द्या”

“स्वच्छता अभियानाच्या जाहिरातींवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा प्रशासनाने आधी स्वतःच्या मुख्यालयातील वास्तव पाहावे,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहर स्वच्छतेचे दावे करणाऱ्या प्रशासनाच्या इमारतीतच अस्वच्छतेचे वास्तव पाहायला मिळत असल्याने मनपा प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

तातडीच्या कारवाईची मागणी

नागरिकांनी संबंधित शौचालयांची तात्काळ साफसफाई करण्यासह पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच, या गंभीर दुर्लक्षासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

स्वच्छ शहराचे स्वप्न दाखवणाऱ्या अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या मुख्यालयातच घाणीचे वास्तव उघड झाल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. आता नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासन कितपत गंभीर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button