AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत माता रुक्मिणी पालखी यात्रेचे भव्य स्वागत; यश खोडके यांनी घेतले दर्शन व कृपाशिर्वाद

अमरावती : विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या ४३२ व्या पालखी यात्रेचे अमरावती शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. तपोवन गेट-विद्यापीठ चौक येथे शोध प्रतिष्ठानच्या वतीने पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी पालखीचे पूजन, दर्शन घेत श्रींचे कृपाशिर्वाद प्राप्त केले.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणारी विदर्भातील मानाची माता रुक्मिणी पालखी २२ जून रोजी अमरावतीत दाखल झाली. टाळ, मृदंग, वीणेचा नाद आणि “रुक्मिणी मातेचा जयघोष” यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

यावेळी बोलताना यश खोडके यांनी सांगितले की, कौंडण्यपूर ते पंढरपूर हा पालखी सोहळा केवळ धार्मिक परंपरा नसून विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. चार शतकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आजही वारकरी संप्रदायाला भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांची प्रेरणा देत आहे.

पालखीचे पूजन केल्यानंतर त्यांनी विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली. तसेच बळीराजा सुखावण्यासाठी आणि राज्यात चांगला पाऊस पडावा, अशी मनोकामना त्यांनी माता रुक्मिणीच्या चरणी व्यक्त केली.

दरम्यान, पालखी स्वागत सोहळ्यात रांगोळ्या, फुलांची उधळण आणि आतषबाजी करून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देताना यश खोडके यांनी पालखी खांद्यावर घेऊन काही अंतरापर्यंत मार्गक्रमण केले.

या सोहळ्यामुळे तपोवन गेट-विद्यापीठ चौक परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. शोध प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माता रुक्मिणीची ही मानाची पालखी आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार असून, शेकडो वारकरी भक्तिभावाने या यात्रेत सहभागी झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button