अमरावतीतील ‘नो एंट्री’वर तोडगा काढण्यासाठी हालचाली; ट्रान्सपोर्टधारकांची पोलिसांसोबत बैठक

सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत जड वाहनांना बंदी; मालवाहतुकीसाठी स्वतंत्र वेळेचा पर्याय तपासणार
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या ‘नो एंट्री’ नियमामुळे मालवाहतूक व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार ट्रान्सपोर्टधारकांनी केली आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्याने अत्यावश्यक मालवाहतूक सेवांनाही अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या निदर्शनास आणून दिले.
या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात पोलीस विभाग आणि ट्रान्सपोर्टधारकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि मालवाहतूक व्यवसाय या तिन्ही बाबींचा समतोल साधण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नो एंट्रीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का, यावर बैठकीत विचारविनिमय झाला. जड वाहनांसोबतच हलकी आणि मध्यम मालवाहू वाहने यांच्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्याचा पर्यायही तपासण्यात येणार आहे.
नो एंट्री पूर्णपणे उठवण्याऐवजी दिवसातील तीन ते चार तासांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने मालवाहतुकीला परवानगी देण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळतानाच अत्यावश्यक मालाची वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दरम्यान, ट्रान्सपोर्टधारकांनी नो एंट्रीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याची व्यथा मांडली. मालाची वेळेत वाहतूक होत नसल्याने व्यापारी आणि वाहतूकदारांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी इतर महानगरांमधील वाहतूक नियमांचा अभ्यास करून अमरावती शहरासाठी व्यवहार्य आणि नागरिकहिताचा पर्याय शोधण्याच्या सूचना पोलीस वाहतूक विभागाला दिल्या.
नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवत अत्यावश्यक मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी नो एंट्री अधिसूचनेत फेररचना करण्याची शक्यता आता तपासली जाणार आहे. त्यामुळे अमरावतीतील नो एंट्री नियमांमध्ये नेमका कोणता बदल होणार, याकडे व्यापारी आणि ट्रान्सपोर्टधारकांचे लक्ष लागले आहे.



