करपलेल्या सोयाबीनची उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी; शंभर टक्के मदतीची गरज असल्याचे स्पष्ट

रिधोरा गावातून पाहणी दौऱ्याला सुरुवात; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भीषणता आज प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खामगाव तालुक्यातील रिधोरा गावापासून पीक पाहणी दौऱ्याला सुरुवात करत करपलेल्या सोयाबीनची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

शेतात सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाही लागलेल्या नसल्याने नुकसानीची तीव्रता स्पष्ट होत होती. यावेळी हातात करपलेले सोयाबीनचे रोप घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पिकाला शंभर टक्के मदतीची गरज असल्याचे सांगितले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात खामगाव आणि मोताळा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पीक नुकसान आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेण्यात आल्या. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री आकाश फुंडकर, कृषी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हातात करपलेले सोयाबीनचे रोप घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या पिकाला शंभर टक्के मदतीची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक नुकसानीची गंभीरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आणि कधी मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



