कोलकाता विमानतळावर विमान अपहरणाची धमकी; एअर इंडियाच्या विमानात आढळला संदेश, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले!

मुंबईला जाणारे विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच टॉयलेटच्या आरशावर धमकीचा संदेश; सीआरपीएफ कमांडो, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाकडून तपासणी
कोलकाता : कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी विमान अपहरणाच्या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली. मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या टॉयलेटमधील आरशावर अपहरणाची धमकी देणारा संदेश लिहिलेला आढळल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. विमान उड्डाणासाठी सज्ज असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी आपापल्या आसनांवर बसले होते. विमान धावपट्टीकडे रवाना होण्याच्या तयारीत असतानाच एका क्रू मेंबरच्या निदर्शनास विमानाच्या शौचालयातील आरशावर हाताने लिहिलेला अपहरणाचा धमकीचा संदेश आला. या प्रकाराची माहिती संबंधित क्रू मेंबरने तातडीने पायलटला दिली. त्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधत आपत्कालीन अलर्ट जारी केला.
धमकीची माहिती मिळताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. सुरक्षेच्या कारणास्तव विमान मुख्य धावपट्टीपासून दूर असलेल्या आयसोलेशन बे परिसरात नेण्यात आले. त्यानंतर सीआरपीएफ कमांडो, बॉम्ब शोधक व निकामी पथक तसेच श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
सुरक्षा यंत्रणांनी विमानाचे आपत्कालीन दरवाजे उघडून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना विमानतळावरील सुरक्षित लाउंजमध्ये हलवण्यात आले. विमानातील प्रत्येक आसन, प्रवाशांचे सामान, केबिन आणि कार्गो विभागाची मेटल डिटेक्टर तसेच श्वान पथकाच्या मदतीने तपासणी सुरू करण्यात आली.
दरम्यान, विमानाच्या टॉयलेटमधील आरशावर धमकीचा संदेश नेमका कोणी लिहिला आणि त्यामागे काय उद्देश होता, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. यासाठी विमानातील प्रवाशांची यादी तपासण्यासोबतच ग्राउंड स्टाफ आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती आहे. मात्र, विमान उड्डाणाच्या अगदी काही क्षण आधी अपहरणाची धमकी मिळाल्याने कोलकाता विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी धावपळ उडाली. धमकीमागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.



