amravatiAmravati GramincitynewsDhamangaon

भाऊबीजेच्या आनंदावर विरजण! शहापूर येथे २५ वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना; प्रदीर्घ आजारपणाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक चर्चा, पतीसह दोन लहान मुलींवर दुःखाचा डोंगर

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी संतोष वाघमारे : भाऊबीजेसारख्या आनंदाच्या सणादिवशीच धामणगाव रेल्वे तालुक्यातील शहापूर येथे एका २५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण शहापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

सौ. शारदा दिनेश चौधरी (वय अंदाजे २५ वर्षे, रा. शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शारदा चौधरी यांनी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्या प्रदीर्घ आजारपणामुळे त्रस्त असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या दुर्दैवी घटनेत शारदा चौधरी यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. भाऊबीजेच्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असण्याऐवजी घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button