आठ महिन्यांपासून पिंजऱ्यात असलेल्या ‘डॉली’ वाघिणीला जंगलात मुक्त कधी करणार?

प्रकृती सुधारल्यानंतरही परतवाड्यातील ट्रान्झिट केअर युनिटमध्ये वास्तव्य; नैसर्गिक अधिवासात पुनर्वसनासाठी वन्यजीव प्रेमींची मागणी, वनविभागाच्या निर्णयाकडे लक्ष
परतवाडा | प्रतिनिधी : गेल्या आठ महिन्यांपासून परतवाडा येथील टिंबर डेपो परिसरातील ट्रान्झिट केअर युनिटमध्ये देखरेखीखाली असलेल्या ‘डॉली’ वाघिणीच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघिणीची प्रकृती आता सुधारली असून ती सुदृढ असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तिला आणखी किती दिवस पिंजऱ्यात ठेवणार आणि तिची जंगलात मुक्तता कधी होणार, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

डॉली वाघिणीच्या आरोग्याची ट्रान्झिट केअर युनिटमध्ये नियमित काळजी घेतली जात आहे. तिला दररोज साधारण आठ ते नऊ किलो बकऱ्याचे मांस खाद्य म्हणून दिले जाते. तसेच पिण्याचे पाणी आणि आरोग्यविषयक आवश्यक देखरेख केली जाते. डॉ. चंद्रकांत धंदर हे दररोज तब्बल बारा तास तिच्या देखरेखीमध्ये आणि आवश्यक उपचारांमध्ये वेळ देत असल्याची माहिती आहे.
प्रजननक्षमतेच्या दृष्टीने पुनर्वसनाचा विचार आवश्यक
डॉली वाघिणीची दोन वेळा मासिक पाळी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिच्या प्रजननक्षमतेच्या दृष्टीनेही योग्य नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्याची शक्यता तपासली जात आहे. सुरक्षित वातावरणात तिचे पुनर्वसन झाल्यास भविष्यात वाघांच्या संवर्धनासाठीही योगदान मिळू शकते, अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमी व्यक्त करीत आहेत.
आईच्या भूतकाळातील घटनांमुळे पुनर्वसनाचा प्रश्न संवेदनशील
मात्र, डॉली वाघिणीच्या पुनर्वसनाचा निर्णय घेणे वनविभागासाठी सोपे नाही. चंद्रपूर जिल्ह्यात तिच्या आईने चार महिलांची शिकार केल्याची पार्श्वभूमी सांगितली जाते. याच कारणामुळे डॉलीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी विरोध दर्शविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तिच्या सुरक्षित पुनर्वसनाचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला आहे.
महाराष्ट्रात मेळघाट, पेंच, सह्याद्री आणि ताडोबा असे चार प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी कोणत्या अधिवासात डॉलीचे पुनर्वसन करणे योग्य ठरेल, याचा वनविभागाने वन्यजीव तज्ज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ तिची प्रकृती सुधारली म्हणून तिला जंगलात सोडणे योग्य ठरणार नाही, तर तिचे वर्तन, शिकार करण्याची क्षमता, मानव-वन्यजीव संघर्षाचा संभाव्य धोका आणि संबंधित अधिवासाची परिस्थिती यांचाही विचार करावा लागणार आहे.
मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे पत्रव्यवहार; निर्णय अद्याप प्रतीक्षेत
डॉली वाघिणीच्या पुनर्वसनासंदर्भात अमरावती येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप तिच्या भवितव्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे डॉलीला नैसर्गिक अधिवास मिळणार की तिचे ट्रान्झिट केअर युनिटमधील वास्तव्य आणखी वाढणार, याकडे वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहे.
वन्यजीव प्रेमींचे सिटी न्यूजच्या माध्यमातून आवाहन
डॉली वाघिणीच्या पुनर्वसनाबाबत वनविभागाने आता स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे. तिच्या आरोग्याची सखोल तपासणी, नैसर्गिक अधिवासाची उपलब्धता, मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता आणि तज्ज्ञांचे मत या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. डॉलीला जंगलात सोडणे शक्य असल्यास त्यासाठी सुरक्षित ठिकाण निश्चित करावे आणि शक्य नसल्यास त्यामागील कारणेही जनतेसमोर स्पष्ट करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉली वाघिणीच्या आरोग्यापासून तिच्या नैसर्गिक पुनर्वसनापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर सिटी न्यूजने डॉ. चंद्रकांत धंदर यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून डॉलीची सद्यस्थिती, तिची देखभाल आणि पुनर्वसनासंदर्भातील महत्त्वाच्या बाबी समोर येणार आहेत.



