Amravati GramincitynewsLatest NewsMaharashtra

शेगाव रहाटगाव रोडवर पाणीटंचाईचा उद्रेक! नागरिक थेट खड्ड्यात उतरले; पाइपलाइन दुरुस्तीचे आश्वासन

अमरावती : शेगाव रहाटगाव रोड परिसरात एअरटेल कंपनीकडून सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ खोदकामादरम्यान एमजीपीआरएची पाइपलाइन फुटल्याचा आरोप असून, मागील आठ ते दहा दिवसांपासून परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

पाइपलाइन फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. या समस्येबाबत महानगरपालिकेला निवेदन देऊनही अद्याप ठोस तोडगा निघाला नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर संतप्त नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत थेट खोदलेल्या खड्ड्यात उतरून आंदोलन केले. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा प्रभावित झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने मध्यस्थी केली. प्रशासनाकडून दुपारपर्यंत पाइपलाइन दुरुस्ती करून पाणीपुरवठ्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र, प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक चंदू खेडकर यांनी दिला आहे.

आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता प्रशासन प्रत्यक्षात किती वेगाने कारवाई करते, पाइपलाइनची दुरुस्ती वेळेत होते का आणि नागरिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत होतो का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button