नागपूर पोलिसांचा ‘अलर्ट मोड’; बाजारपेठांमध्ये पायदळ पेट्रोलिंग

सदर परिसरात पोलिसांची विशेष गस्त; मेगाफोनद्वारे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नागपूर | प्रतिनिधी
नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर पोलिसांकडून विशेष पायदळ पेट्रोलिंग राबविण्यात आले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांच्या संकल्पनेतून सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा विशेष उपक्रम घेण्यात आला.
सदर मार्केट, कराची लाईन, नवी मंगळवारी मार्केट आणि छावणी मार्केट या गर्दीच्या परिसरात पोलिसांनी पायदळ गस्त घालत नागरिकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. बाजारपेठांमध्ये पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
पेट्रोलिंगदरम्यान मेगाफोनच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने डायल 112 या क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
या विशेष पायदळ पेट्रोलिंगमध्ये 5 पोलीस अधिकारी आणि 22 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशील परिसरात पोलिसांची वाढलेली गस्त ही नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
नागरिकांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारचे पायदळ पेट्रोलिंग आणि जनजागृती उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



