citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

मुदियार चौकात पोलिसांची गांजा तस्करीविरोधात कारवाई; पावणे दोन किलो गांजासह एकाला अटक!

शांतीनगर पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान संशयित इसम ताब्यात; वाहनाच्या डिकीत आढळला गांजाचा साठा, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूर : शहरात अवैध अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याच अनुषंगाने शांतीनगर पोलिसांनी मुदियार चौक परिसरात कारवाई करत एका इसमाला पावणे दोन किलो गांजासह अटक केली आहे. आबीद आरिफ खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नाईट पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेत वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या डिकीत गांजाचा साठा आढळून आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याचे नाईट ऑफिसर आणि नाईट तपास पथक मुदियार चौक परिसरात रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. यावेळी एका इसमाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी तत्काळ त्याला थांबवून ताब्यात घेतले आणि त्याच्या वाहनाची झडती घेतली. या तपासणीदरम्यान वाहनाच्या डिकीत जवळपास पावणे दोन किलो गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीसह गांजाचा साठा ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची खातरजमा करण्यासाठी त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत संबंधित पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अवैधरीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी आबीद आरिफ खान याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला होता, त्याची विक्री कोणाला करणार होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच आरोपीचा यापूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीसह अन्य कोणत्याही गुन्ह्यात सहभाग होता का, याचीही पडताळणी केली जात आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आणि पोलीस उपनिरीक्षक कुंभारे यांनी केली. शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button