Amaravti Graminamravaticitynewslatestnewss breakingnews

संघर्षाच्या अंधारात समरसतेचा दीपोत्सव! शकुंतला रेल्वे स्थानकावर शेकडो दिव्यांनी उजळली दिवाळी

शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीचा आठव्या वर्षी अनोखा उपक्रम; चिमुकल्यांना फटाके, नागरिकांना फराळाचे वाटप, ब्रॉडगेजच्या मागणीसाठी ४२ व्या टप्प्यात अहिंसात्मक जनआंदोलन

अचलपूर : एकीकडे दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या परिसरातील नागरिकांच्या संघर्षाला आशेचा प्रकाश देणारा अनोखा दीपोत्सव अचलपूर येथील शकुंतला रेल्वे स्थानकावर साजरा करण्यात आला. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीच्या वतीने सलग आठव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक समरसता, बंधुभाव आणि जनहिताच्या लढ्याचा संदेश देण्यात आला. शेकडो दिव्यांनी रेल्वे रुळांचा परिसर उजळून निघाला, तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फटाक्यांच्या आनंदाने हास्य फुलले.

शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून रेल्वे सेवा पुन्हा सक्षम करण्याच्या मागणीकडे राज्य शासन, केंद्र शासन आणि रेल्वे बोर्डाचे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने हे प्रतीकात्मक आणि अहिंसात्मक जनआंदोलन राबविण्यात येत आहे. यंदा या आंदोलनाने आठवे वर्ष पूर्ण केले असून, संघर्षाचा ४२ वा टप्पा गाठला आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी ४.३० वाजता या सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली. नगराध्यक्षा रुपाली माथणे, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवन बवणेर, प्राचार्य दिनेश मोहोड, शकुंतला रेल्वे बचाव समितीचे मुख्य संघटक योगेश खानझोडे, राजा धर्माधिकारी, दीपा तायडे आणि शारदा उईके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शेकडो नागरिकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. लहान बालकांना फटाके देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्यात आले.

यानंतर माहेर फाउंडेशन आणि जमात-ए-इस्लामी हिंद महिला शक्तीच्या सदस्यांनी एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत रेल्वे रुळांवर शेकडो दिवे प्रज्वलित केले. विविध धर्म, जाती आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत साजरा केलेला हा दीपोत्सव परिसरातील सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला.

नगराध्यक्षांकडून सत्याग्रहींच्या संघर्षाला सलाम!

या अनोख्या उपक्रमाने प्रभावित झालेल्या नगराध्यक्षा रुपाली माथणे यांनी सत्याग्रही समितीच्या कार्याचे कौतुक केले. राजकारण आणि समाजकारणात अनेकदा एकमेकांचे पाय खेचण्याची प्रवृत्ती दिसून येते; मात्र जनतेला निःस्वार्थ संघर्षाची किंमत माहीत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शकुंतला रेल्वे बचाव समितीचा लढा लवकरच यशस्वी होऊन रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, असा अनोखा आणि निःस्वार्थ सामाजिक उपक्रम पाहून आपणही या सत्याग्रहींच्या पाठीशी उभे राहणार आहोत. शकुंतला रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन नसून संपूर्ण परिसरातील जनतेची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी पवन बवणेर यांनी रेल्वे रुळांवर दिवे प्रज्वलित करून बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहणे हा अलौकिक अनुभव असल्याची भावना व्यक्त केली. तर प्राचार्य दिनेश मोहोड यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजचे महत्त्व स्पष्ट केले. या जनहिताच्या आंदोलनाला आपला नेहमीच पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले.

१७ ग्रामपंचायतींचे ठराव; राष्ट्रपतींकडूनही दखल

समितीचे मुख्य संघटक योगेश खानझोडे यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी परिसरातील १७ ग्रामपंचायतींचे ठराव समितीला प्राप्त झाले आहेत. तसेच अचलपूर नगरपरिषदेकडूनही या मागणीच्या समर्थनार्थ ठराव देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध सामाजिक संघटनांनीही संमतीपत्रे देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

विशेष म्हणजे, २०२३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींकडूनही शकुंतला रेल्वेच्या प्रश्नाची दखल घेण्यात आल्याचे खानझोडे यांनी नमूद केले. आता समितीच्या वतीने केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन ब्रॉडगेजसाठी आवश्यक निधीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गरज भासल्यास मेळघाटासह चार जिल्ह्यांतील रेल्वे वाहतुकीच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रपतींची भेट घेण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

या दीपोत्सवात माहेर फाउंडेशन, क्रांतीज्योती संघटना, मराठा सेवा संघ, आदिवासी पर्यावरण संघटना आणि जमात-ए-इस्लामी हिंद महिला संघटनेसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यास्मिन बानो, सायरा बानो, नाझिया खान, मेहरा बानो, नाहिरा खान, बेबीताई वजाळे, गंगा दाभाडे, प्रज्ञा नेतनराव, निकिता पाटील, सीमा वडगावकर, चंद्रकला खंडारे, आशा गवई, मीना ठोसर, भारती पावडे, अंजू पाटील, मनोज पांडे, श्याम ठोसर यांच्यासह शेकडो नागरिक आणि बालगोपाल उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वऱ्हाडी कवी राजा धर्माधिकारी यांनी केले, तर दीपा तायडे यांनी आभार मानले.

दिवाळीच्या दिव्यांनी उजळलेले शकुंतला रेल्वे स्थानक, विविध धर्मीय नागरिकांचा एकत्रित सहभाग आणि ब्रॉडगेजसाठी सुरू असलेला अहिंसात्मक संघर्ष… या अनोख्या उपक्रमातून अचलपूरकरांनी एकच संदेश दिला, तो म्हणजे रेल्वेचा विकास हा केवळ प्रवासाचा विषय नसून संपूर्ण परिसराच्या प्रगतीचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button