राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची शेतकरी आणि निराधार मुलांसोबत दिवाळी; सामाजिक बांधिलकीतून जपला माणुसकीचा दीप!

पुसद तालुक्यातील चार गावांना सहपत्नीक भेट; आनंदाचा शिधा, दिवाळी फराळ, मिठाई आणि ब्लँकेटचे वाटप, बालकांसोबत फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
दुर्गेश कान्हू | यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ, दि. ८ : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले असताना, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. पुसद तालुक्यातील गौळ मांजरी, चिलवाडी, भगतवाडी आणि श्रीरामपूर या गावांना त्यांनी सहपत्नीक भेट देत शेतकरी कुटुंबीय, निराधार मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री नाईक यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतीसमोरील आव्हाने, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच गावपातळीवरील विविध प्रश्न जाणून घेत त्यांच्या संभाव्य उपाययोजनांवर चर्चा केली. संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाहीही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

दिवाळीचा सण केवळ भेटवस्तूंपुरता मर्यादित न ठेवता त्यात आपुलकीचा आणि आनंदाचा रंग भरण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पुसदच्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’, दिवाळी फराळ आणि विविध मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट देऊन त्यांच्याप्रती आदर आणि जिव्हाळा व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, गावातील लहान बालकांसोबत फटाके फोडून आणि त्यांना फटाक्यांचे वाटप करून राज्यमंत्री नाईक यांनी बालकांच्या आनंदात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, तर उपस्थित कुटुंबीयांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या मनातील समाधान हीच आपल्यासाठी खरी दिवाळी असल्याची भावना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यमंत्री नाईक यांनी ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. सणासुदीच्या काळात शेतकरी, निराधार बालके आणि गरजू कुटुंबांशी संवाद साधत त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्याच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
सामाजिक जाणीव, माणुसकीची आपुलकी आणि शेतकरी कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश देणारी ही दिवाळी गावकऱ्यांसाठी संस्मरणीय ठरली.



