amravaticitynewsFestival Newslatestnewss breakingnews

दिवाळीत या मंदिरात वाटला जातो पैशांचा प्रसाद! ४३ वर्षांची अनोखी परंपरा; बरकतीच्या आशेने देशभरातून भाविकांची गर्दी

अमेरिकेतूनही चार भाविक अमरावतीत दाखल; लक्ष्मीपूजनानंतर मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत प्रसादाचे वितरण, अवघ्या १०० भाविकांपासून सुरू झाला होता उपक्रम

अमरावती : दिवाळी म्हटले की लक्ष्मीपूजन, धन-समृद्धी आणि सुख-शांतीची कामना केली जाते. मात्र, अमरावतीत एक असे अनोखे मंदिर आहे, जिथे लक्ष्मीपूजनानंतर मिठाई, लाह्या यांसोबत चक्क पैशांचा प्रसादही वितरित केला जातो. या पैशांच्या प्रसादाची परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अखंड सुरू असून, बरकत मिळावी आणि घरात सुख-समृद्धी नांदावी, या श्रद्धेने देशभरातून हजारो भाविक येथे दाखल होतात. विशेष म्हणजे, यंदा अमेरिकेतूनही चार भाविक या अनोख्या परंपरेत सहभागी होण्यासाठी अमरावतीत पोहोचले.

अमरावती शहरातील स्मशानभूमी परिसरात असलेल्या श्री महाकाली माता शक्तिपीठात दरवर्षी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर विशेष बरकत कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी देवीच्या दर्शनासोबतच भाविकांना लाह्या, मिठाई आणि पैशांचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद मिळविण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. वाढती गर्दी लक्षात घेता मध्यरात्रीपासून सुरू होणारे प्रसाद वितरण सकाळपर्यंत सुरू राहते. भाविकांची गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात केला जातो.

श्री महाकाली माता शक्तिपीठाचे श्री १००८ शक्ती महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनोख्या परंपरेची सुरुवात १९८३ मध्ये माता महाकालीच्या प्रेरणेने करण्यात आली. सुरुवातीला अवघ्या १०० भाविकांच्या उपस्थितीत बरकत कार्यक्रम सुरू झाला होता. मात्र, काळानुसार या उपक्रमाची माहिती दूरवर पोहोचली आणि आज हजारो भाविक या कार्यक्रमात सहभागी होतात. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण अशा सर्वच वयोगटांतील भाविकांची येथे मोठी उपस्थिती असते.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे आकर्षण आता केवळ अमरावती किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, नागपूर, मुंबई आणि यवतमाळसह देशाच्या विविध भागांतून भाविक येथे येतात. यंदा तर अमेरिकेतून चार भाविक अमरावतीत दाखल झाले. त्यांनी मंदिरात दर्शन घेत पैशांच्या प्रसादाचा लाभ घेतला आणि शक्ती महाराजांची भेटही घेतली. त्यामुळे या ४३ वर्षांच्या परंपरेची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचल्याचे चित्र आहे.

पैशांच्या प्रसादाचे नेमके करतात काय?

मंदिरात मिळणारा पैशांचा प्रसाद भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या घरी घेऊन जातात. अनेक जण हा प्रसाद घरातील तिजोरीत, बँकेच्या लॉकरमध्ये किंवा दुकानातील गल्ल्यात ठेवतात. हा प्रसाद जवळ ठेवल्याने घरात आणि व्यवसायात बरकत राहते, तसेच माता महाकाली आणि माता लक्ष्मीची कृपा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शक्ती महाराज यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या संख्येत सुमारे चार ते पाच हजारांनी वाढ होत आहे.

धार्मिक परंपरेसोबत आर्थिक संदेशही!

या अनोख्या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर एक महत्त्वाचा आर्थिक संदेशही असल्याचे शक्ती महाराज सांगतात. पैसा केवळ तिजोरीत बंद करून ठेवण्याऐवजी तो समाजात आणि व्यवहारात फिरता राहिला पाहिजे. पैशांचे चलनवलन सुरू राहिल्यास आर्थिक घडामोडींना चालना मिळते आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लागतो, असा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवघ्या १०० भाविकांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज हजारो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. दिवाळीच्या निमित्ताने अमरावतीतील श्री महाकाली माता शक्तिपीठातील पैशांच्या प्रसादाची ही अनोखी परंपरा पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ४३ वर्षांची परंपरा, देशभरातून येणारे भाविक आणि अमेरिकेपर्यंत पोहोचलेली ख्याती यामुळे अमरावतीच्या धार्मिक वैभवात या बरकत कार्यक्रमाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button