
दिवाळीच्या तोंडावर शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा सिटी न्यूजने मांडला; मुख्य रस्त्यांवरील घनकचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
अमरावती : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रमुख रस्त्यांवर साचलेल्या घनकचऱ्याच्या प्रश्नाला सिटी न्यूजने वाचा फोडताच महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. शहरातील अस्वच्छतेचे वास्तव सिटी न्यूजने बातमीच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर महापालिकेच्या कंत्राटदारांकडून रात्रीपासूनच कचरा उचलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, मुख्य मार्गांवरील कचरा हटविण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम आता प्रत्यक्ष शहरात दिसू लागला आहे.
दिवाळी सणामुळे अमरावती शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शहराच्या चारही दिशांनी नागरिकांची वर्दळ वाढली असताना प्रमुख रस्त्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात घनकचरा साचल्याचे चित्र पाहायला मिळत होते. रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक बंद करून मार्गक्रमण करण्याची वेळ आली होती.
सणासुदीच्या काळात शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असतानाही कचरा उचलण्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. शहरातील या अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा सिटी न्यूजने ठळकपणे मांडला. शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
सिटी न्यूजवर ही बातमी प्रसारित होताच महापालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारांकडून रात्रीपासूनच जेसीबीच्या सहाय्याने साचलेला घनकचरा उचलण्यास सुरुवात करण्यात आली. मुख्य रस्ते आणि परिसरातील कचरा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याने शहरातील स्वच्छतेच्या कामाला गती मिळाली आहे.
दरम्यान, सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेत प्रत्यक्ष स्वच्छता सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, केवळ बातमी प्रसारित झाल्यानंतर किंवा तक्रारी आल्यानंतरच महापालिकेने कामाला लागणे अपेक्षित नाही. दिवाळीपुरतेच नव्हे, तर वर्षभर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित कचरा संकलन आणि योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने स्वच्छतेची ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सिटी न्यूजचा सवाल एवढाच – शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी बातमीचा दणका द्यावा लागणार का?



