citynewsJalnaLatest NewsMaharashtra

दुचाकीस्वाराला वाचवताना क्रेटा विहिरीत कोसळली; सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

भोकरदनच्या पारध-वालसावंगी मार्गावरील भीषण अपघात; कारचालक गंभीर जखमी, धोकादायक विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भोकरदन | प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील पारध-वालसावंगी मार्गावर शुक्रवारी रात्री काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात घडला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव क्रेटा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सासू आणि सुनेचा मृत्यू झाला असून, कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धावडा येथील अल्तमश खान हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कारने पारध येथून वालसावंगीकडे जात होते. प्रवासादरम्यान अचानक समोर भरधाव दुचाकी आल्याने दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने कार वळवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या प्रयत्नात कारवरील ताबा सुटला आणि काही क्षणांतच कार रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत कोसळली. अपघातात अकतरा बी अमानुल्ला खान आणि सुलताना बी जियाउल्ला खान यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सासू-सुनेचा समावेश आहे. तर कारचालक अल्तमश खान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीची वेळ आणि खोल विहिरीमुळे बचावकार्य मोठे आव्हान ठरले. तरीही ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पारध पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले.

या दुर्घटनेनंतर रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या विहिरीबाबत काही महिन्यांपूर्वीही सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विहिरीभोवती संरक्षक कठडे किंवा सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरी, नाले आणि इतर जोखमीच्या ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या परिसरात कायमस्वरूपी रुग्णवाहिका आणि आपत्कालीन मदत यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना घडलेल्या या भीषण दुर्घटनेने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासू-सुनेच्या मृत्यूमुळे धावडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अपघातातील जखमी कारचालकावर उपचार सुरू असून, दुर्घटनेचा पुढील तपास पारध पोलीस करीत आहेत. रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींना तातडीने संरक्षण देण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button