गडचिरोलीत पूरस्थिती गंभीर; भामरागडमध्ये ५२५ नागरिकांचे रेस्क्यू

गडचिरोली : शेजारील छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला बसला आहे. पुराचे पाणी वाढल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्थलांतर मोहीम राबवत सुमारे ५२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपासून सुरू झालेली रेस्क्यू आणि स्थलांतराची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुराचे पाणी आता हळूहळू ओसरू लागल्याने बाधित भागातील परिस्थितीतही काही प्रमाणात सुधारणा होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पूरस्थिती निर्माण होताच जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने तातडीने स्थलांतर मोहीम सुरू केली. नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य ठेवून विविध भागांतील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, बिनागोंडा आश्रमशाळेतील एका आजारी विद्यार्थिनीचेही सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले. NDRFच्या पथकाच्या मदतीने तिला पुराच्या पाण्यातून मार्ग काढत गुंडेनूर नाला ओलांडून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पूराचे पाणी काही प्रमाणात ओसरत असले तरी नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी अद्याप सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि ज्या रस्त्यांवर किंवा मार्गांवर अद्याप पाणी वाहत आहे, अशा ठिकाणी प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत प्रशासनाकडून बाधित भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार असून, गरज भासल्यास पुढील बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.



