citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

दहा वर्षांपासून बोगस डॉक्टरकीचा आरोप; धामणगावात ‘गायत्री क्लिनिक’वर धाड

अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शन्स, सलाईनसह वैद्यकीय साहित्य जप्त; संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे तालुक्यात वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अधिकृत पदवी किंवा परवाना नसतानाही तब्बल दहा वर्षांपासून अॅलोपॅथी उपचार करत असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तळेगाव दशासर येथील आठवडी बाजार परिसरातील ‘गायत्री क्लिनिक’वर बोगस डॉक्टर शोध समितीने धाड टाकून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय देवरावजी सवंदळे (वय ५०) हे गेल्या दहा वर्षांपासून गायत्री क्लिनिक चालवत असल्याची माहिती आहे. क्लिनिकच्या फलकावर वैद्यकीय क्षेत्रात अस्तित्वात नसलेल्या पदव्यांचा उल्लेख करून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी गोपनीय तक्रार प्राप्त झाल्यानंतर २३ जुलै रोजी बीडीओ प्रफुल्ल बोरखडे यांच्या अध्यक्षतेखालील बोगस डॉक्टर शोध समितीने क्लिनिकवर अचानक धाड टाकली.

या कारवाईदरम्यान क्लिनिकमधून अॅलोपॅथी औषधे, इंजेक्शन्स, सलाईन, ब्लड रिपोर्ट्स आणि प्रिस्क्रिप्शनसह विविध वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित व्यक्तीकडे वैध वैद्यकीय पदवी किंवा उपचार करण्यासाठी आवश्यक परवाना आहे का, याची तपासणी करण्यात आली. मात्र, वैध वैद्यकीय पदवी किंवा परवाना सादर करण्यात सवंदळे अपयशी ठरल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक सुदेवाड यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिसांनी संजय सवंदळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, या कारवाईमुळे परिसरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यक्तींविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button