agriculturecitynewsLatest NewsMaharashtraNagpur graminramtek

रामटेकमध्ये किसान जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांच्या ९ मागण्यांसाठी सरकारला इशारा

खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात मोर्चा; हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन

रामटेक | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रामटेकमध्ये किसान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या नऊ सूत्रीय मागण्यांसाठी शासनाला निवेदन देत त्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

रामटेक येथील लंबे हनुमान मंदिर परिसरातून किसान जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. गांधी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चा रामटेक एसडीओ कार्यालय परिसरात पोहोचला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, पेंच कालव्याचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, नवीन वीज जोडण्या देण्यात याव्यात तसेच शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा, यासह नऊ प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार रमेश कोलपे यांना देण्यात आले.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा खासदार श्यामकुमार बर्वे यांनी दिला.

या मोर्चामुळे रामटेक परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली असून, शासन या नऊ सूत्रीय मागण्यांवर कोणता निर्णय घेते, याकडे रामटेकसह पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button