अमरावतीत कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा? १० दिवसांपासून स्वच्छता ठप्प; नगरसेवकानेच हाती घेतले कचरा गाडीचे स्टेअरिंग!

शेगाव-रहाटगाव परिसरात कचऱ्याचे ढीग; कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना वेतन आणि पीएफ न मिळाल्याचा आरोप, चंदू खेडकरांचा आंदोलनाचा इशारा
अमरावती
अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्या दहा दिवसांपासून स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप होत आहे. शेगाव-रहाटगाव परिसरात कचरा संकलन ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे.
या परिस्थितीवर प्रशासन आणि कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदू खेडकर यांनी थेट कचरा गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. त्यांनी स्वतः कचरा गाडी चालवत घराघरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली.
प्रभाग क्रमांक एकमधील शेगाव-रहाटगाव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून कचरा संकलन व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कंत्राटदाराकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन तसेच पीएफसह आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी कामावर येत नसल्याचे सांगितले जात आहे.
स्वच्छता कर्मचारी उपलब्ध नसल्याने परिसरातील अनेक ठिकाणी कचरा साचला असून, नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.
या परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नगरसेवक चंदू खेडकर यांनी स्वतः कचरा गाडी चालवत नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृतीमुळे प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंदू खेडकर यांनी केली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत कारवाई करण्यात आली नाही, तर महापालिकेच्या स्वच्छता विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
एकीकडे नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असताना दुसरीकडे नगरसेवकालाच कचरा गाडी चालवून घराघरातून कचरा उचलण्याची वेळ आल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता प्रशासन संबंधित कंत्राटदाराविरोधात काय कारवाई करते, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काय तोडगा काढला जातो आणि प्रभाग क्रमांक एकमधील कचरा संकलन व्यवस्था किती लवकर सुरळीत होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी विशेष रिपोर्ट.



