Accident NewsBuldhanacitynewsHighwayAccidentLatest NewsMaharashtraTruckAccident

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; संभाजीनगरच्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज सकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२६.५ जवळ भरधाव वेगातील फॉर्च्युनर कारने समोरून जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच सिंदखेडराजा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त फॉर्च्युनर कारमध्ये संभाजीनगर येथील डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी गुलसितान बी सय्यद आसिफ (वय ४५) प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, या डॉक्टर दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या अपघातात कार चालक शेख साजिद शेख फरीद, डॉ. सय्यद आसिफ यांची मुलगी कु. नबा सय्यद आसिफ आणि मुलगा सय्यद अजबमाज सय्यद आसिफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, मृत डॉक्टर दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

समृद्धी महामार्गावरील आणखी एका भीषण अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंदखेडराजा पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button