नागपूरात घरफोडीचा उलगडा; गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरातील नंदनवन परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने उलगडा केला आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून लाखो रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाकडून तपास आणि गस्त सुरू होती.
दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना एक संशयित व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी त्याची चौकशी करून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिवळ्या धातूची एक लगड आढळून आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या या सोन्याच्या लगडीचे वजन अंदाजे ४४ ग्रॅम असून तिची किंमत सुमारे ४ लाख ४० हजार रुपये आहे. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने श्रीनगर परिसरात सुमारे १५ दिवसांपूर्वी घरफोडी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी अभिलेखांची पडताळणी केली असता संबंधित घरफोडीचा गुन्हा नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी चेतन मनोज बुराडे (वय २४ वर्षे, रा. नंदनवन) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीला पुढील तपासासाठी नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पुढील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



