राळेगाव प्रकरणात मोठी कारवाई; आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर बुलडोजर

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे अल्पवयीन आदिवासी मुलीच्या कथित विक्री प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असताना, प्रशासनाने आज या प्रकरणातील मुख्य आरोपी मजहर कुरेशी यांच्या घरावर बुलडोजर चालवत मोठी कारवाई केली.
राळेगावमधील वली दादा बादशहा परिसरात मजहर कुरेशी यांनी उभारलेले घर अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर नगरपंचायतीने यापूर्वीच त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही संबंधित बांधकाम हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे आज नगरपंचायतीने थेट कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने हे घर जमीनदोस्त केले.
ही कारवाई नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गिरीश पाळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच आरोपीचे संपूर्ण बांधकाम पाडण्यात आले.
या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले. “अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. तसेच, या प्रकरणामुळे आदिवासी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, सामाजिक संघटना आणि स्थानिकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींच्या विक्रीसारख्या गंभीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
या घटनेमुळे केवळ एका आरोपीवर कारवाई झाली असली, तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



