citynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

नागपूरमध्ये पाणीपुरी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला; जुन्या वादातून चाकूने वार, आरोपी फरार

नागपूरमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अजनी पोलीस ठाणे हद्दीत पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली रंजिश इतकी भडकली की थेट जीव घेण्याचाच प्रयत्न करण्यात आला.

ही गंभीर घटना नागपूरच्या अजनी पोलीस ठाणे हद्दीतील ज्ञानेश्वर नगर परिसरात सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली. जखमी अमन धनराज चौरसिया (वय 23) हा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल रोजी रात्री अमनचा एका आरोपीसोबत किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी वाद मिटला असला तरी आरोपींनी मनात राग धरून ठेवला होता.

27 एप्रिल रोजी अमन आपल्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी थर्माकोलचे अक्षर घेण्यासाठी पेंटर थर्माकोल दुकानाजवळ गेला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.

मुख्य आरोपी दिनेश सोलंकी याने मागून येत अमनच्या डोक्यावर चाकूने वार केला. त्यानंतर अजय सोलंकी आणि इतर साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या हल्ल्यात अमन गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2) आणि 3(5) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्य आरोपींसह सर्व संशयित सध्या फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध वेगाने सुरू आहे.

नागपूरमध्ये किरकोळ वादातून थेट जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button