अमरावतीत मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम; कारवाई की केवळ दिखावा? लाखोंचा खर्च, परिणाम मात्र शून्य!

अमरावतीत महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बडनेरा परिसरात मोठ्या गाजावाजात राबवण्यात आलेल्या या कारवाईनंतर प्रशासनाने अतिक्रमण हटवल्याचा दावा केला असला, तरी नागरिकांनी मात्र या मोहिमेच्या परिणामकारकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या आदेशानुसार बडनेरा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात राबवण्यात आली. नवी वस्ती, जुनी वस्ती, समता चौक, छत्री चौक, जय हिंद चौक आणि आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चवरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
मात्र, या कारवाईनंतर नागरिकांमध्ये समाधानापेक्षा नाराजीच अधिक दिसून येत आहे. कारण दरवेळी लाखो रुपयांचा खर्च करून अतिक्रमण हटवले जाते, पण काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभे राहत असल्याचे चित्र आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, ही मोहीम फक्त तात्पुरती आणि दिखाऊ ठरत आहे. “अतिक्रमण हटवल्यानंतर ते पुन्हा उभे राहतेच कसे?”, “कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाही?”, “वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई का होत नाही?” असे सवाल नागरिक आता उघडपणे विचारत आहेत.
विशेष म्हणजे, याच भागात यापूर्वीही अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती. तरीदेखील त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण उभे राहत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनपाकडून या मोहिमांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना प्रत्यक्षात परिणाम मात्र शून्य दिसत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे ही मोहीम फक्त फोटोसेशन, आकडेवारी आणि दिखाव्यापुरतीच मर्यादित आहे का, अशी चर्चा बडनेरा परिसरात रंगू लागली आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जाते, तर दुसरीकडे वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे.
अतिक्रमण हटवणे ही फक्त एकदिवसीय कारवाई नसून, त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवणे हीच खरी जबाबदारी आहे. अन्यथा लाखो रुपयांचा खर्च करून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमा केवळ दिखाव्यापुरत्याच मर्यादित राहतील, अशी भावना आता नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
अमरावतीत मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ही कारवाई खरंच कायमस्वरूपी उपाय आहे की केवळ दिखावा, यावर प्रशासन काय उत्तर देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.



