धारणीत गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव | दुर्गामाता मंदिरात शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद

गुरुपौर्णिमेनिमित्त धारणी शहरातील दुर्गामाता मंदिरात मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती जिल्ह्यासह परिसरातील शेकडो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. याच दिवशी अनेक भाविक मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील धुणीवाले दादाजी यांच्या दर्शनासाठी रवाना होत असतात. तर धारणी तालुक्यातील विविध गावांमध्येही गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
धारणी येथील दुर्गामाता मंदिर परिसरासह पेट्रोल पंपासमोरील ठिकाणी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात लालामहाराज जोशी, अशोक भागवत मित्र मंडळ, अनिल मालवीय, दीनू धनेवार आणि निरज मालवीय यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.
भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण धारणी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.



