हुडकेश्वरमधील जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई

एक आरोपी तर दुसरा विधिसंघर्षग्रस्त बालक; कोराडी मंदिर परिसरातून ताब्यात, पुढील तपास सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने अटक केली आहे. यापैकी एक आरोपी तर दुसरा विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायत्री निकेश सूर्यवंशी (वय ३५) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यापूर्वी पाच आरोपींना अजनी पोलिसांनी, तर दोन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार होते.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील दोन संशयित कोराडी मंदिर परिसरात फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत एका आरोपीने आपले नाव पियुष नारायण बबेळ (वय १९), रा. ज्ञानेश्वर नगर, अजनी, नागपूर असे सांगितले. तर दुसरा संशयित हा विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांनाही पुढील चौकशी व कायदेशीर प्रक्रियेसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत असून, गुन्ह्यातील इतर बाबींचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे पोलीस निरीक्षक विनायक गोले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



