citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात ७० वर्षीय वृद्धाची ५० हजारांची बॅग लंपास!

बँकेतूनच पाठलाग केल्याचा संशय; लिफ्टजवळ दुचाकीस्वाराने बॅग हिसकावली, घटना CCTV मध्ये कैद

नागपूर | सिटी न्यूज

नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या बॅग चोरीची घटना समोर आली आहे. दीपक नगर येथील नागभूमी सोसायटीमधील रेडिएंट अपार्टमेंट परिसरात एका अज्ञात दुचाकीस्वाराने ७० वर्षीय ज्ञानेश्वर नाईक यांच्या हातातील ५० हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बँकेतून पेन्शनचे पैसे काढून घरी परतले

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नाईक यांनी २६ ऑक्टोबर रोजी फेडरल कॉलनी येथील इंडियन बँकेतून आपल्या पेन्शन खात्यातून १ लाख ५० हजार रुपये काढले होते. त्यापैकी ५० हजार रुपये त्यांनी बॅगेत ठेवले, तर उर्वरित रक्कम खिशात ठेवली होती.

घरी परतल्यानंतर ते अपार्टमेंटच्या आवारात लिफ्टजवळ उभे होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात वृद्ध खाली पडले

बॅग हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पकडण्याचा ज्ञानेश्वर नाईक यांनी प्रयत्न केला. मात्र, या धावपळीत त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. आरोपी बॅग घेऊन पसार झाला.

चोरी झालेल्या बॅगेत ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह बँकेचे पासबुक, चेकबुक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) बुक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे होती.

बँकेपासून पाठलाग केल्याचा संशय

वृद्धाने बँकेतून मोठी रक्कम काढल्यामुळे आरोपीने त्यांच्यावर बँकेपासूनच नजर ठेवली होती का, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आरोपीने प्रत्यक्षात पाठलाग केला होता का, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

CCTV च्या आधारे पोलिसांकडून तपास

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button