नागपुरात उपचाराच्या नावाखाली ३.५० लाखांची फसवणूक! दोन आरोपी अटकेत

पायातील आजार बरा करण्याचे आमिष; गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई, ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर | सिटी न्यूज
नागपूरमध्ये वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ने तपास करून राजस्थानमधील दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पायातील आजारावर उपचार करण्याचे दिले आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गोपाळ पांडुरंग निनावे (वय ७३) हे नागपूरमधील शांतिनगर परिसरात राहतात. त्यांना मधुमेहाचा त्रास असून दोन्ही पायांना सूज असल्याने ते उपचारासाठी जात होते.
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी खाजगी कामानिमित्त ते राणी दुर्गावती चौक परिसरात गेले असताना त्यांची दोन अनोळखी व्यक्तींशी भेट झाली. त्यापैकी एकाने आपले नाव अरुण असल्याचे सांगितले. त्यालाही अशाच प्रकारचा आजार असल्याचे सांगून त्याने हिराबाग येथील एका डॉक्टरांकडे उपचार घेतल्याने आराम मिळाल्याचा दावा केला.
यानंतर आरोपींनी तक्रारदाराचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक घेतला.
१०० कांद्यांच्या पॅकचे आमिष
२७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता तक्रारदाराला फोन करून, आपण त्यांच्या घराजवळ उपचारासाठी आलो असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दोघांनी घरी येऊन तक्रारदाराशी संवाद साधला.
त्यांच्या पायातील त्रासावर उपचार करण्यासाठी १०० कांद्यांचे पॅक लावावे लागतील, असे सांगण्यात आले. प्रत्येक पॅकची किंमत ३,५०० रुपये असल्याचे सांगून एकूण ३ लाख ५० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपी घरातून निघून गेले.
काही वेळानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला.
या तपासात मोहम्मद बाबुल मोहम्मद सलीम (वय ४०, रा. बूंदी, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने साथीदार मोहम्मद सलाम नुरुद्दीन (वय ४५, रा. बूंदी, राजस्थान) याच्यासोबत गुन्हा केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही आरोपींकडून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी शांतिनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नविंचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सिटी न्यूज | नागपूर



