राष्ट्रीय महामार्ग ४४ वर भीषण अपघात! बसचालकाचा जागीच मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

डुमरीजवळ पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बस कोसळली; पहाटेच्या दुर्घटनेने खळबळ
पारशिवनी, नागपूर | प्रतिनिधी : अजय मेहरकुळे, रामटेक
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला. जबलपूरहून नागपूरच्या दिशेने जाणारी प्रवासी बस डुमरी परिसरात उलटून बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत बसचालक सुनील यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहाटेच्या सुमारास बस खड्ड्यात कोसळली
मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक MH27-8X 6521 जबलपूरहून नागपूरकडे जात होती. बुधवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास डुमरीजवळ पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस सुमारे सहा फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
चालकाचा मृत्यू; जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल
या भीषण अपघातात बसचालक सुनील यादव यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
बांधकामस्थळावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असताना खोदलेल्या खड्ड्यात प्रवासी बस कोसळल्याने बांधकामस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घटनास्थळी योग्य सूचना फलक, बॅरिकेड्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना होत्या की नाहीत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सिटी न्यूज | प्रतिनिधी अजय मेहरकुळे | रामटेक



