16 किमी रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांत बसून ग्रामस्थांचे चक्का जॅम आंदोलन

उमरी मेघे–मांडवा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी; अपघातांच्या मालिकेमुळे नागरिक आक्रमक
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघातील उमरी मेघे ते मांडवा या 16 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून चक्का जॅम आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उमरी मेघे ते मांडवा या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
झाडगाव, बेलगाव, दिग्रस, बोरगाव आणि सावळी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावर चक्का जॅम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी थेट खड्ड्यांमध्ये बसून घोषणाबाजी करत रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील कथित अवैध खदानीतून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
यावेळी नागरिकांनी पालकमंत्री तथा खाणिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर आणि स्थानिक आमदार राजेश बकाने यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला. लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी इशारा दिला की, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उमरी मेघे ते मांडवा मार्गावरील दुरवस्था आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिकांचा संयम सुटल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. आता प्रशासन या मागण्यांवर कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



