पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर रविकांत तुपकर; अन्यायकारक पंचनाम्याविरोधात जनआंदोलनाचा इशारा

जळगाव जामोद तालुक्यात पूरग्रस्त भागांची पाहणी; शंभर टक्के नुकसानभरपाई आणि विशेष पॅकेजची मागणी
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अलीकडील महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अन्यायकारक पंचनामे होऊ नयेत आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
पूरग्रस्त गावांतील पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी शेती, केळीच्या बागा, विहिरी, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर यंत्रणा तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात शंभर टक्के नुकसान झाले असतानाही पंचनाम्यांमध्ये कमी नुकसान दाखवले जात असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.
यावेळी त्यांनी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तसेच पूरग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे आणि भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी सातपुडा परिसरातील नद्या व नाल्यांचे खोलीकरण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.
महापुरामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून आता शासन आणि प्रशासन पूरग्रस्तांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



