साहूरमध्ये जुगार अड्ड्यावर वलगाव पोलिसांचा छापा; १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त

गणेश मंडळामागे कापडी कनातीत सुरू होता जुगार; दोघे ताब्यात, १० ते १२ जण फरार
अमरावती शहरातील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. साहूर परिसरातील शिवाजी चौकात गणेश मंडळामागे कापडी कनातीत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२० सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वलगाव पोलिसांना साहूर येथील शिवाजी चौक परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पंचांसह पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्या सुमारे १० ते १२ जणांनी अंधाराचा तसेच परिसरातील गल्लीबोळींचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी कारवाई करत मनोज प्रल्हाद आमटे आणि उदय हिमचंद बोंडे या दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, टीव्हीएस ज्युपिटर १२५ दुचाकी, पत्ते आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये ताब्यात घेतलेल्या आरोपींसह फरार झालेल्या व्यक्तींविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
वलगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून, फरार झालेल्या व्यक्तींवर पुढील काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.



