जालन्यात रस्त्यावर ५०० आणि २ हजारांच्या नोटांसारखे कागद; दिवाळीच्या तोंडावर खळबळ!

सामनगाव रोडवर कागदांचे बंडल आणि तुकडे विखुरलेले; नागरिकांची घटनास्थळी गर्दी, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
जालना : रस्त्यावर अचानक पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांसारखे दिसणारे कागद मोठ्या प्रमाणात विखुरलेले आढळल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सामनगाव रोडवर हा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त केले जात आहे. रस्त्यावर नोटांसारखे कागद पडल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक पाहणीत हे कागद अस्सल चलनी नोटा नसून नोटांसारखे दिसणारे कागद असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हे कागद नेमके कुठून आले आणि कोणी टाकले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
जालना शहरातील सामनगाव रोडवर स्वराज रेस्टॉरंटजवळ हा प्रकार उघडकीस आला. रस्त्याच्या कडेला तसेच परिसरात पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांसारखे दिसणारे कागद आणि त्यांचे तुकडे मोठ्या प्रमाणात विखुरलेले होते. सकाळच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात चर्चांना सुरुवात झाली. काही कागदांचे बंडलही आढळल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी नारायण रामचंद्र बुट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले असताना स्वराज रेस्टॉरंटजवळील गेटच्या बाहेर त्यांना सर्वत्र कोरे कागद पडलेले दिसले. पुढे गेल्यानंतर काही लोकांच्या हातात कागदांचे बंडल असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कागदांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे शिक्के असल्यासारखे दिसत होते. काही कागद एका बाजूने कोरे होते, तर काही ठिकाणी बंडल स्वरूपात कागद आढळल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची पाहणी केली. हे कागद नेमके कोणत्या उद्देशाने रस्त्यावर टाकण्यात आले, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी हे कागद जाणीवपूर्वक टाकण्यात आले होते का, की यामागे अन्य काही कारण आहे, यासह विविध शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कागद रस्त्यावर कोणी आणि कधी टाकले, याचा शोध घेतला जात आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या अनोख्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून, या कागदांमागचे गूढ उकलण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



