नागपूरच्या गणेशपेठेत १० वर्षीय मुलीसोबत गैरवर्तनाचा आरोप; एकाला अटक, दोघांविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा!

कॉटन मार्केट कांजी हाऊस परिसरातील घटना; वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई, दुसऱ्या आरोपीच्या भूमिकेचा तपास सुरू
नागपूर : शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कॉटन मार्केट येथील कांजी हाऊस परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्या आरोपीबाबत तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे असून शेजारी राहतात. आरोपी क्रमांक एक हा फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा असून, तो अधूनमधून त्यांच्या घरी येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी आरोपीने फिर्यादीला घर खाली करून जाण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या दहा वर्षीय मुलीचा हात पकडून तिच्या लज्जेला धक्का पोहोचेल असे कृत्य केले. यावेळी आरोपी क्रमांक दोनदेखील त्याच्यासोबत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणी आकाश मुन्नालाल गौर आणि राजा मुन्नालाल गौर या दोघांविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६०/२६ नोंदवण्यात आला आहे. आकाश मुन्नालाल गौर याला ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून २९ मिनिटांनी अटक करण्यात आली. तर दुसऱ्या आरोपीची भूमिका आणि या प्रकरणातील पुढील बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.
या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत.



