citynewsCrime NewsMorshi

कुटुंब गाढ झोपेत असताना चोरट्यांचा डल्ला; अडगावमध्ये १ लाख ६७ हजारांचे सोने-रोख लंपास!

मध्यरात्री घरात शिरून कपाटातील दागिने आणि रोकड चोरी; चार महिन्यांच्या चिमुकलीसह संपूर्ण कुटुंब झोपेत असताना घरफोडी, शिरखेड पोलिसांत तक्रार दाखल.

अमरावती : जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मोर्शी तालुक्यातील अडगाव येथे कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या चोरीमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडगाव येथील रहिवासी योगेश विनोदराव विठ्ठले (वय २७) हे शेतीमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, मोठा अविवाहित भाऊ, पत्नी आणि अवघ्या चार महिन्यांची मुलगी आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्यांनी जेवण केल्यानंतर झोप घेतली होती.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला. घरातील सदस्य गाढ झोपेत असल्याने चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचा संशय आहे. ५ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना कपाट उघडे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणी केली असता घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे उघड झाले.

या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याशिवाय सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, अंदाजे किंमत ६० हजार रुपये, तसेच तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे किंमत ३० हजार रुपये, असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी फिर्यादी योगेश विठ्ठले यांनी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ४ नोव्हेंबरच्या रात्री १२.३० ते ५ नोव्हेंबरच्या पहाटे पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, घरातील सर्व सदस्य झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील घरांनाही चोरटे लक्ष्य करत असल्याने रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या घरफोडीतील आरोपींचा शोध घेऊन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान शिरखेड पोलिसांसमोर आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button