AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

१.७७ लाखांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या कोटारी टर्मिनलला मनपाचा दणका; तीन मालमत्तांना ठोकले सील!

दस्तूरनगरच्या चैतन्य कॉलनीतील मालमत्तांवर मनपाची जप्तीची कारवाई; पूर्व झोन क्रमांक ३ च्या पथकाची धडक मोहीम.

अमरावती : अमरावती महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, दस्तूरनगर परिसरातील कोटारी टर्मिनलवर जप्तीची कारवाई केली आहे. तब्बल १ लाख ७७ हजार २३० रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने कोटारी टर्मिनलच्या तीन मालमत्तांना सील ठोकले. गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिकेच्या पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील वॉर्ड C-2 मधील चैतन्य कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली. कोटारी टर्मिनलच्या मालमत्ता क्रमांक ३९६२-१७, ३९६२-९ आणि ३९६२-१० या तीन मालमत्तांवर दीर्घकाळापासून मालमत्ता कराची थकबाकी होती. वारंवार कर भरण्याबाबत पाठपुरावा करूनही थकीत रक्कम जमा न झाल्याने प्रशासनाने जप्तीनाम्यानुसार संबंधित मालमत्तांना सील करण्याची कारवाई केली.

महानगरपालिकेच्या थकीत कर वसुली मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पूर्व झोन क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक क्षेत्रीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अजय चव्हाण, आकाश चौधरी आणि आनंद बुंदिले यांच्या उपस्थितीत मनपाच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाकडून थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकीदार मालमत्तांवर नियमानुसार जप्ती आणि सील करण्याची कारवाई सुरू आहे. शहरातील नागरिकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कराचा तातडीने भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष : शहरातील कर वसुलीचा वेग वाढविण्यासाठी मनपाने थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या या कारवाईमुळे इतर मालमत्ताधारकांचेही लक्ष वेधले गेले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button