BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांची मॉक ड्रिल! दंगा काबू पथकासह आपत्कालीन तयारीची चाचणी

फेक कॉल मिळताच पोलिसांचा घटनास्थळी धावता प्रतिसाद; विविध पथकांमधील समन्वय आणि संवेदनशील ठिकाणांच्या बंदोबस्ताची पाहणी

मेहकर, बुलढाणा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी आपली आपत्कालीन तयारी तपासली. जानेफळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगा काबू पथकासह विशेष मॉक ड्रिल घेण्यात आली. अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा किती वेगाने प्रतिसाद देते, विविध पथकांमध्ये समन्वय कसा साधला जातो आणि परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवले जाते, याची प्रत्यक्ष चाचणी या सरावातून घेण्यात आली.

या मॉक ड्रिलसाठी जानेफळ हद्दीतील घुटी वेस येथे मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याचा फेक कॉल देण्यात आला. कॉल मिळताच जानेफळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहकर डिव्हिजनचे RCP पथक, तसेच मेहकर आणि डोणगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संभाव्य दंगल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कोणत्या पद्धतीने कारवाई करावी, याचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.

केवळ बळाचा वापर न करता तणावाची परिस्थिती शांततेने हाताळण्यासाठी शांतता समितीच्या माध्यमातून संवाद साधण्याचे प्रात्यक्षिकही या मॉक ड्रिलमध्ये करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा प्रतिसाद, पथकांमधील समन्वय आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता तपासण्यात आली.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी देखील सज्ज ठेवण्यात आले होते.

याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात संवेदनशील ठरणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. संभाव्य गर्दी आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर फिक्स पॉईंट बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. सण-उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कसा प्रतिसाद द्यायचा, याचीही चाचणी घेण्यात आली.

अचानक उद्भवणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांचा प्रतिसाद अधिक वेगवान, प्रभावी आणि समन्वयपूर्ण राहावा, यासाठी ही मॉक ड्रिल महत्त्वाची ठरली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जानेफळ पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या सरावातून स्पष्ट झाले.

सिटी न्यूजसाठी गजानन राऊत, मेहकर, बुलढाणा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button