AkolacitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeWashim

कमरगावात चोरट्यांचा धुमाकूळ; मंदिरांनंतर घर-दुकानांनाही लक्ष्य

देवतांच्या दागिन्यांपासून मूर्तींच्या डोळ्यांपर्यंत चोरी; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील कमरगाव येथे गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरांतील देवतांचे दागिने, मूर्तींचे डोळे चोरीला जाण्याच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी घरांसमोर आणि दुकानांसमोरही हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारांमुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

कमरगाव व परिसरात सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय परिसरातील काळा मारुती मंदिर आणि मुख्य हनुमान मंदिरातील मूर्तींचे डोळे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. त्यानंतर चोरट्यांनी मरिमाय देवस्थानालाही लक्ष्य केले. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या मंदिरात दोन वेळा चोरी झाली असून देवीच्या चांदीच्या भुवया, नाकातील चांदीची पट्टी चोरीला गेल्याचे सांगितले जाते. तसेच देवीचे डोळे काढण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

धार्मिक स्थळांवरील चोरीनंतर आता चोरट्यांची मजल थेट घरांच्या आणि दुकानांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढवण्याची, मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि संवेदनशील भागात कडक बंदोबस्त ठेवण्याची तसेच चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. गावातील शांतता आणि नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कमरगावातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांचा छडा लावून दोषींना जेरबंद करण्यात पोलिस प्रशासनाला कितपत यश मिळते, याकडे ग्रामस्थांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button