गुडघेदुखीवरील उपचाराच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला २.९४ लाखांचा गंडा!

डॉक्टर असल्याचे भासवून तीन अनोळखी व्यक्ती घरी पोहोचल्या; रोख रक्कम, गुगल पे आणि चेकद्वारे उकळले पैसे; कोतवाली, शांतिनगरनंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघड
नागपूर : गुडघेदुखीवर उपचार करून देण्याचे आमिष दाखवत ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. डॉक्टर असल्याचे भासवून तीन अनोळखी व्यक्तींनी घरी जाऊन उपचाराच्या नावाखाली पैसे उकळल्याची तक्रार गुलशन मायादास कोहली यांनी पोलिसांत दाखल केली आहे. विशेष म्हणजे, अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे प्रकार यापूर्वी कोतवाली आणि शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही समोर आले आहेत. त्यामुळे शहरात अशा प्रकारे नागरिकांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रारीनुसार, गुलशन कोहली हे १५ तारखेला आपल्या पत्नीसोबत दवाखान्यातून उपचार घेऊन घरी परतत होते. यावेळी रस्त्यात त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने कोहली यांच्या पत्नीच्या पायात किंवा गुडघ्यात दुखत आहे का, अशी विचारणा केली. त्यावर पत्नीला गुडघेदुखीमुळे चालण्यास त्रास होत असल्याचे कोहली यांनी सांगितले.
याच संधीचा फायदा घेत त्या व्यक्तीने मुंबईचे डॉक्टर शिंदे आपल्या ओळखीचे असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आपल्या आईवरही गुडघेदुखीचे उपचार केले असून, आता त्या व्यवस्थित चालू शकत असल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने कोहली यांना संबंधित डॉक्टरांचा मोबाईल क्रमांक दिला.
कोहली यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या पत्नीवरही उपचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच १८ किंवा १९ तारखेला नागपुरात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर १९ तारखेला पुन्हा एका व्यक्तीचा फोन आला. त्याने घराचे लोकेशन मागितल्याने कोहली यांनी ते पाठवून दिले.
काही वेळातच एक व्यक्ती त्यांच्या घरी पोहोचला. त्याने डॉक्टर शिंदे थोड्याच वेळात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी एक व्यक्ती घरी आला आणि त्याने स्वतःची ओळख डॉक्टर शिंदे अशी करून दिली. पत्नीच्या गुडघेदुखीवर उपचार करण्याचे सांगत त्याने काही प्रक्रिया केल्याचा बहाणा केला. याचदरम्यान या व्यक्तींनी कोहली यांच्याकडून एकूण २ लाख ९४ हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या रकमेपैकी ५० हजार रुपये रोख स्वरूपात, काही रक्कम गुगल पेच्या माध्यमातून, तर उर्वरित रक्कम चेकद्वारे घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचाराच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतर संबंधित व्यक्तींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने कोहली यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
एकाच पद्धतीने फसवणुकीचे प्रकार; नागरिकांनी सतर्क राहावे!
विशेष म्हणजे, गुडघेदुखीवरील उपचाराच्या नावाखाली फसवणूक करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी कोतवाली आणि शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्ती डॉक्टर असल्याचे सांगून घरपोच उपचार देण्याचे आमिष दाखवत असल्यास नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही व्यक्तीची वैद्यकीय पात्रता आणि ओळख तपासल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवू नये. घरगुती उपचारांच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी झाल्यास तात्काळ सावध व्हावे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास किंवा फसवणुकीचा प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.



