AMCActionAmravaticitynews

वाढीव घरटॅक्स कमी करण्याची मागणी; राजवीर जनहित संघटनेचे निवेदन

विधानसभा व मनपा निवडणुकीदरम्यानचा स्थगिती आदेश पुन्हा लागू करण्याची मागणी; मनपा आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

अमरावती शहरातील वाढीव घरटॅक्स अर्थात मालमत्ता कराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाढीव घरटॅक्स कमी करावा तसेच यापूर्वी देण्यात आलेला स्थगिती आदेश पुन्हा कायम करावा, अशी मागणी राजवीर जनहित संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

राजवीर जनहित संघटनेचे शहराध्यक्ष सैयद जुनैद आणि बडनेरा शहराध्यक्ष वाजिद अहमद यांच्या नेतृत्वाखाली अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

अमरावती महानगरपालिका हद्दीतील लाखो घरांसह मॉल, मंगल कार्यालये, हॉल आणि सांस्कृतिक भवनांवर वाढविण्यात आलेला मालमत्ता कर कमी करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनातून केली आहे. वाढीव करामुळे नागरिक तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर आर्थिक भार वाढत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीच्या काळात वाढीव घरटॅक्सला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हा स्थगिती आदेश हटवण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हा स्थगिती आदेश नेमका का हटवण्यात आला, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.

यासोबतच नवनिर्वाचित नगरसेवकांनी महानगरपालिका सभागृहात नागरिकांच्या या प्रश्नावर ठोस भूमिका का मांडली नाही, असा प्रश्नही राजवीर जनहित संघटनेने उपस्थित केला आहे.

वाढीव मालमत्ता कराचा फेरविचार करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच पूर्वीचा स्थगिती आदेश पुन्हा लागू करावा, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे. आता शासन आणि महानगरपालिका प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button