AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeMorshi

मोर्शी पोलिसांची 24 तासांत घरफोडी उघड; दोन आरोपी अटकेत, 5.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

भिंतीला छिद्र पाडून घरफोडी; रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यातील कार हस्तगत

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. घराच्या भिंतीला छिद्र पाडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि अन्य साहित्य चोरी करणाऱ्या आरोपींकडून रोख रक्कम, दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा एकूण 5 लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट रोजी मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे ही घरफोडीची घटना घडली. फिर्यादी सिताराम भानगे यांनी घर बांधण्यासाठी बकऱ्या विकून मिळालेले 90 हजार रुपये, पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच महत्त्वाची कागदपत्रे लोखंडी संदुकात ठेवली होती.

सकाळी ते बकऱ्या चारण्यासाठी बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या कुडाच्या भिंतीला छिद्र पाडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी संदुकासह रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा सुमारे 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाला वेग दिला.

या तपासादरम्यान अवघ्या 24 तासांच्या आत कुणाल शहाणे आणि प्रशिक इंगळे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून 20 हजार 500 रुपये रोख, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हुंडाई कंपनीची कार जप्त केली. एकूण 5 लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मोर्शी पोलिसांनी जलद आणि कौशल्यपूर्ण तपास करत अल्पावधीत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून, मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button