AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत मिनी महापौर निवडणुकीत महायुतीचा दबदबा; चार झोनवर बिनविरोध सत्ता, झोन 3 मध्ये बसपाचा ‘मिनी महापौर’

अमरावती महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीचा दबदबा पाहायला मिळाला आहे. मिनी महापौर निवडणुकीत महायुतीने चार झोनवर बिनविरोध सत्ता मिळवत शहरातील आपले राजकीय वर्चस्व कायम राखले आहे. विशेष म्हणजे, यावेळी बहुजन समाज पक्षाच्या साथीनं समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला असून, झोन 3 मध्ये बसपाचा मिनी महापौर निवडून आला आहे.

29 एप्रिल रोजी अमरावती महानगरपालिकेच्या मिनी महापौर पदाची निवडणूक पार पडली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली. शहरातील चारही झोनमध्ये महायुती समर्थित उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

झोन क्रमांक 1 रामपुरी कॅम्प येथून भाजपच्या माधुरी ठाकरे यांची मिनी महापौर म्हणून निवड करण्यात आली. झोन 2 राजापेठ येथून स्वाती कुळकर्णी यांनीही बिनविरोध विजय मिळवत महायुतीची ताकद दाखवून दिली.

यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिला तो झोन क्रमांक 3 दस्तूर नगर. येथे राजकीय समीकरणांमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. बहुजन समाज पक्षाचे इस्माईल कासम लालूवाले यांची मिनी महापौर म्हणून निवड झाली. बसपा, शिंदे गट शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे ही निवड शक्य झाल्याची चर्चा रंगली आहे.

तर झोन क्रमांक 4 बडनेरा येथे युवा स्वाभिमान पक्षाचे किशोर जाधव यांनी विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली.

दरम्यान, झोन क्रमांक 5 भाजीबाजार येथे एकही नामांकन अर्ज दाखल न झाल्यामुळे या ठिकाणी निवड प्रक्रिया होऊ शकली नाही.

या निवडणुकीत बसपाने महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे अमरावतीतील राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. निवडीनंतर इस्माईल लालूवाले यांनी सर्व नेत्यांचे आभार मानत शहर विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

अमरावतीतील मिनी महापौर निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी बसपाच्या एंट्रीमुळे शहरातील पुढील राजकारण अधिक रंगणार हे निश्चित मानले जात आहे. आता या नव्या राजकीय समीकरणांचा शहर विकासावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button