citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरात ‘ऑपरेशन थंडर’चा मोठा प्रहार; एम.डी. ड्रग्स विकणारा आरोपी रंगेहाथ अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत अजनी पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. म्हणजेच मॅफेड्रोन या प्रतिबंधित ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील ड्रग्स नेटवर्कवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे.

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 एप्रिलच्या रात्री चिमणी चौक, ठवरे हायस्कूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, हर्षल राकेश ब्राम्हणे हा युवक एन-टॉर्क मोपेडवरून एम.डी. ड्रग्स विक्रीसाठी येणार आहे.

माहितीच्या आधारे अजनी पोलिसांनी परिसरात सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीकडून सुमारे 18.200 ग्रॅम मॅफेड्रोन हा प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 72 हजार 800 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याशिवाय आरोपीकडून 5 झिपलॉक पिशव्या, 70 हजार रुपयांची एन-टॉर्क मोपेड आणि 6 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत एकूण 1 लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, शहरातील ड्रग्स रॅकेटविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

सध्या आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या ड्रग्स रॅकेटमागील इतर आरोपी आणि पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

नागपूरमध्ये ड्रग्सविरोधात पोलिसांचा कडक अॅक्शन सुरू असून, ‘ऑपरेशन थंडर’मुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button