अमरावतीत ACB ची धडक कारवाई; सोलर नोंदणीसाठी लाच मागणारे MSEB अधिकारी जाळ्यात

अमरावतीत भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एमएसईबी कार्यालयातील लाचखोरीचा पर्दाफाश केला आहे. सोलर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटरला ACB ने रंगेहात पकडले असून, उपकार्यकारी अभियंत्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमरावतीतील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MSEB) कार्यालयाशी संबंधित हा प्रकार उघडकीस आला. सोलर पॅनल व्यवसाय करणाऱ्या ३७ वर्षीय तक्रारदाराने ‘ग्रीन एनर्जी’ या नावाने सोलर नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून तब्बल २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
तक्रारदाराने चर्चा केल्यानंतर ही रक्कम १५ हजार रुपयांवर ठरवण्यात आली. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ACB पथकाने २८ एप्रिल रोजी सापळा रचला. या कारवाईदरम्यान कॉम्प्युटर ऑपरेटर श्यामकुमार इझाटे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच ACB ने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता वर्ग-२ बाळासाहेब खंडारे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांच्या घरांची झडतीही सुरू आहे. या तपासातून आणखी काही महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता ACB ने व्यक्त केली आहे.
अमरावतीतील या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांतील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ACB च्या या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी कोणती नावे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



