नागपुरात 70 ग्रॅम एमडीसह ड्रग्स तस्कर जेरबंद; सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

लकी मनपिया अटकेत, विधीसंघर्षित बालकाचा सहभाग उघड; फरार आरोपीचा शोध सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून पोलिसांनी धडक कारवाई करत 70 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडरसह एका ड्रग्स तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत तीन महागडे मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकाचा सहभागही समोर आला असून आणखी एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका नाल्याजवळ एमडी पावडरची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार एपीआय बारंगे, अजय यादव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला.
कारवाईदरम्यान संशयास्पदरीत्या ॲक्टिव्हा दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून 70 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली. याशिवाय एक आयफोन, दोन अँड्रॉइड मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणात सिरसपेठ येथील लकी मनपिया याला अटक करण्यात आली आहे. तसेच चौकशीत एका विधीसंघर्षित बालकाचा सहभाग उघड झाला असून आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
प्राथमिक चौकशीत आरोपींना एमडीचे व्यसन लागल्यानंतर स्वतःची नशेची गरज भागवण्यासाठी आणि झटपट आर्थिक फायदा मिळवण्यासाठी त्यांनी अमली पदार्थांची विक्री सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ड्रग्स पुरवठा साखळीचाही तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त नागरे पाटील, संयुक्त पोलीस आयुक्त रेड्डी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपायुक्त निलेश अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागपूर पोलिसांनी शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून ड्रग्स तस्करांविरोधातील मोहिम भविष्यातही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



